March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आरोग्य मंत्री टोपे यांनी केंद्राकडे किती लसीची केली मागणी…वाचा..

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या कमी करणं हे प्रशासनासाठी मोठं आव्हानच बनलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्य टोपे यांनी दिल्लीला जाऊन भेट घेतली.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये राजेश टोपे यांनी 1.77 कोटी प्राधान्यक्रमाच्या जनतेचं लसीकरण करण्यासाठी जवळपास 2.20 कोटी कोरोना लसीचा डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. राज्यामध्ये सध्या कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

त्याद्वारे आरोग्य कर्मचारी तसेच इतर कर्मचारी आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे.

राज्यात सुरु असलेल्या लसीकरणामध्ये 1.77 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवलं असून मे-2021 पर्यंत पहिला आणि जून-2021 पर्यंत दुसरा डोस देण्याचं प्राथमिक नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला 2.20 कोटी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा गरजेचा असल्याचं आरोग्य मंत्री टोपे यांनी डॉक्टर हर्षवर्धन यांना सांगितलं.

आवश्यक असलेल्या लसींच्या पुरवठ्यानुसार दर आठवड्याला 20 लाख लसी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केली आहे. राजेश टोपे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषणही तिथे उपस्थित होते.

Leave a Reply